Belagavi

बेळगावसह ३ मनपांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

Share

 निवडणूक कार्यक्रम घोषित होऊन अमलातही आल्याच्या कारणावरून मनपा निवडणुकांना आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टाच्या धारवाड पीठाने फेटाळून लावली. त्यामुळे बेळगावसह मनपांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणात अन्याय झाल्याने मनपा निवडणूक घेण्यास बंदी घालावी अशा आशयाची जनहित याचिका माजी उपमहापौर ऍड. धनराज गवळी व इतरांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केली होती. याच दरम्यान सुमारे आठवडाभरापूर्वी निवडणूक आयोगाने बेळगावसह हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी पालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अशीविनंती याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला केली होती. त्यामुळे मंगळवारी खंडपीठाने सुनावणी घेतली.

त्यादिवशी कामकाजाची वेळ संपल्याने गुरुवारी दुपारी २. वा. सुनावणी घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज दुपारी खंडपीठात सुनावणी घेण्यात आली. निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. एस. आर. कृष्णकुमार यांनी निकाल जाहीर केला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आदर्श आचारसंहिताही अमलात आला आहे. त्यामुळे या टप्प्यावर निवडणुकीला स्थगिती देणे योग्य ठरणार नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. दरम्यान, खंडपीठाच्या या निकालामुळे बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासन आणि इच्छुक उमेद्वारांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Tags: