Belagavi

मनपा निवडणूक अर्ज, कागदपत्रे मराठी भाषेत देण्याची म. ए. समितीची मागणी

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आणि अन्य कागदपत्रे मराठी भाषेत देण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी अथवा इंग्रजी भाषेतील कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. सीमाभागात विशेषतः बेळगावात मराठी भाषकांची संख्या जास्त असल्याने त्यांना मराठी भाषेतील मनपा निवडणूक विषयीचे अर्ज व अन्य कागदपत्रे द्यावीत अशी मागणी या निवेदनात केली आहे. यासंदर्भात माहिती देताना म.ए. समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी म्हणाले, बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज आणि सूचनापत्र केवळ कन्नड भाषेतच उपलब्ध करून दिल्याने कन्नडेतर विशेषतः मराठी भाषकांची मोठी गैरसोय होत आहे. बहुसंख्य उमेदवार मराठी असल्याने त्यांना कन्नड भाषेतील कागदपत्रे वाचता येत नाहीत. कन्नड भाषकांकडून अर्ज भरून घ्यावे तर तो काय लिहितोय हे समजत नाही. त्यामुळे कन्नडप्रमाणेच मराठी अथवा इंग्रजी भाषेतील अर्ज व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी दळवी यांनी केली.

अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी निवेदन स्वीकारून सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: