: विध्यार्थ्यांना शालेय स्तरावरच तांत्रिक शिक्षण देणे ही आज काळाची गरज आहे असे मत क्रियेंटर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निलेश चौगुले यांनी व्यक्त केले. बेळगावात मंगळवारी भरतेश शिक्षण संस्थेच्या डी. वाय. चौगुले हायस्कुलमध्ये केंद्र सरकारच्या अनुदानातून आणि नीती आयोगाच्या मान्यतेने ‘अटलजी टिंकरींग लॅब’चे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, देशात शिक्षणासह सर्व क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. येणाऱ्या काळाची गरज ओळखून आता शालेय स्तरावरच विध्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षण देणे अपरिहार्य आहे. पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तीव्र असते. त्यांना त्याचवेळी उच्च व तांत्रिक शिक्षण दिल्यास तीव्र आकलन क्षमतेच्या बळावर ते नवनवे आविष्कार घडवून आणून शकतात. भरतेश शिक्षण संस्थेने याबाबत पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे एमआयटी बिझनेस एज्युकेशन सेंटरचे माजी कार्यकारी अधिकारी रवींद्र मिरजे म्हणाले, केंद्र सरकारने नीती आयोगाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी ‘अटलजी टिंकरींग लॅब’च्या माध्यमातुन तंत्रज्ञान केंद्रित व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. भरतेश शिक्षण संस्थेच्या प्रशासन मंडळाचे सदस्य विनोद दोड्डण्णावर यांनीही यावेळी विचार मांडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजीव दोड्डण्णावर होते. संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे, प्रशासन मंडळाचे सदस्य अशोक धनवाडे, डी. वाय. चौगुले हायस्कुल प्रशासन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र रामगौंडा आदी उपस्थित होते. प्राचार्य एस. एन. अक्की यांनी स्वागत केले. प्रा. विजय हन्नीकेरी यांनी प्रास्ताविक तर मधु बांगडी यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी उपाध्ये यांनी आभार मानले.



Recent Comments