राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. दरवर्षी पावसाळ्यात खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र पाण्यात बुडून येथील परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त होते. यावर्षीही तीच स्थिती होती. त्यामुळे गेल्याच आठवड्यात आ. अंजली निंबाळकर यांनी पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची बेंगळुरात भेट घेऊन केंद्राची पाहणी करून हे केंद्र खानापूर तालुक्यातीलच मनसापुर येथे स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार डीजीपी प्रवीण सूद यांनी सोमवारी सायंकाळी खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी सूद याना प्रशिक्षण केंद्राची व परिसराची माहिती दिली. 

यावेळी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार, बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, एसपी लक्ष्मण निंबरगी, व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. अंजली निंबाळकर यांच्या दुर्गानगरातील ‘रायगड’ या पाण्यात बुडालेल्या निवासस्थानालाही सूद यांनी भेट दिली. पोलीस प्रशिक्षण केंद्र मनसापुर येथे हलविण्याबाबत सरकारला अहवाल सादर केला जाईल असे त्यांनी आ. निंबाळकर याना सांगितले.


Recent Comments