बेळगाव–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४/अ च्या खानापूर–रामनगर पर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ शनिवारी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी याना निवेदन देण्यात आले.

खानापूर-रामनगर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना, वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुमारे ३०-४० गावातील रहिवाशांना याचा त्रास होत आहे. याकडे लक्ष वेधूनही सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ढिम्म आहे. याचा निषेध म्हणून रुमेवाडी क्रॉस येथे शनिवारी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी याना देण्यासाठीचे निवेदन तहसीलदार रेश्मा तालिकोटी याना देण्यात आले.
यावेळी बोलताना आ. अंजली निंबाळकर यांनी, केंद्र व राज्यातील भाजप सरकार केवळ आश्वासने देतात, काम मात्र करत नाहीत. लोकांना खोटी आश्वासने देतात. रस्ता दुरुस्तीसाठी मी स्वतः अनेकवेळा निवेदने दिली. परंतु हे काम केलेले नाही. येथील खासदार तर बेपत्ता असल्याचे लोक सांगतात. त्यांनाही जनतेच्या त्रासाची पर्वा नाही. २ दिवसांत या स्थगित कमला प्रारंभ झाला नाही तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा दिला.
तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी निवेदन स्वीकारून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु असल्याने गंगवाळी, माणिकवाडी, नायकोल, टिवोली, शिवठाण, भालकी बी. एन., भालकी के. एच., जटगे, डिगेगाळी, घोसे, लोंढा, वाटरे, मासाळी, करंजाळ, कापोली, सिंदोळी, सावरगाळी आदी गावांना वाहतुकीला अडथळा येत आहे.


Recent Comments