Belagavi

बेळगावात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने खळबळ

Share

बेळगावात गुरुवारी सकाळी सीपीएड ग्राऊंडसमोरील रेसकोर्सवर बिबट्यासदृश्य प्राणी दिसून आल्याने खळबळ उडाली. पहाटे फिरायला येणाऱ्या लोकांची त्यामुळे घाबरगुंडी उडाल्याचे पहायला मिळाले.

हनुमान नगरजवळील गोल्फ कोर्स म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या रेसकोर्सवर गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे काही नागरिक फिरायला आले होते. त्यापैकी काहींना झुडुपांजवळ बिबट्यासदृश्य प्राणी दिसून आला. जॉगिंग ट्रॅकजवळील झुडुपामध्येच या प्राण्याची हालचाल दिसून आल्याने त्यांनी एकमेकांना सावध केले. तेथून लागलीच काढता पाय घेत ही घटना वनखात्याला कळविण्यात आली. वन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन प्राण्याचा शोध सुरु केला.पण त्यात यश आले नाही. दरम्यान, रेसकोर्सवर दिसलेला प्राणी बिबट्या होता कि अन्य कोणता हे अद्याप समजून आलेले नाही. त्यासाठी शोधमोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोना लॉकडाउनमुळे रेसकोर्स दोन महिने बंदच होते. नुकताच अनलॉक झाल्यानंतर ते पुन्हा खालून करण्यात आले. त्यामुळे पहाटे वायुविहारासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Tags: